सावंतवाडी नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पाच्या कामकाजावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रभारी नगराध्यक्ष असताना हा विषय मांडला होता, मात्र तीन बैठका होऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्याधिकाऱ्यांनी शासनाशी व संबंधित एजन्सीशी संपर्क सुरू असल्याचे सांगितले. मात्र डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर निरवडेकर यांनी केवळ तोंडी माहिती न देता पत्रव्यवहाराचे पुरावे सभागृहात सादर करण्याची मागणी केली.
दरम्यान, भाजप नगरसेवकांकडून उत्तर देण्याचा प्रयत्न होत असताना माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांनीच उत्तर द्यावे, अशी सूचना केली. नगरसेवक अजय गोंदावळे यांनीही हा प्रकल्प सावंतवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत निरवडेकर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
अखेरीस नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी हस्तक्षेप करून या विषयावर प्रशासन गांभीर्याने विचार करून पुढील कार्यवाही करेल, असे आश्वासन दिले.


